बदलापूर पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार

| बदलापूर | वृत्तसंस्था |

बदलापुरात गुन्ह्यांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता पुन्हा एकदा बदलापूरला हादरवणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी परिसरात राहणाऱ्या भूमिका या तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसापूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिका हिने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकले. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर भूमिका हिच्या घरी एका मित्राने अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी भूमिकाला संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे भूमिकाने सांगितले. यानंतर पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली, यात या तरुणीवर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झाले. मात्र हा अत्याचार एका मित्राने केला, की दोघांनी? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण भूमिका, साताऱ्याहून आलेला मित्र शिवम (22) आणि संतोष (40) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Exit mobile version