नवी मुंबईत परदेशी पाहुण्याचे आगमन; टी.एस. चाणक्य परिसरात छायाचित्रकारांची रेलचेल
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
हिवाळ्याची चाहूल लागताच नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रांमध्ये परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. पाम बीच मार्गावरील टी. एस. चाणक्य परिसरातील विस्तीर्ण पाणथळ जागा सध्या विविध देशांतून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी आकर्षणाचे ठिकाण बनली आहे. या परिसरात दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे पक्षी दाखल होत असल्याने पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांची पावले या भागाकडे वळू लागली आहेत.
यंदाच्या हंगामात टी. एस. चाणक्य परिसरात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘बायलॉन क्रेक’ या पक्ष्याने पक्षीप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. आकाराने लहान असलेल्या या पक्ष्याचे सौंदर्य आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण ठेवण छायाचित्रकारांसाठी आकर्षण ठरत आहे. पक्षी छायाचित्रकार आणि अभ्यासक प्रदीप चौधरी यांनी या दुर्मिळ पक्ष्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. त्यांनी टिपलेले छायाचित्र पक्षीप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरले असून, हा पक्षी पाहण्यासाठी आणि त्याचे छायाचित्र टिपण्यासाठी परिसरात छायाचित्रकारांची गर्दी होत आहे.पक्ष्यांच्या हालचाली टिपण्यासाठी सकाळच्या वेळी छायाचित्रकार मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. दुर्बिणी आणि लांब पल्ल्याच्या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पक्ष्यांचे निरीक्षण केले जात आहे. एखाद्या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन घडल्याची माहिती मिळताच पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढते आणि त्याला पाहण्यासाठी अनेक जण परिसरात पोहोचतात.
‘बायलॉन क्रेक’ हा पाणथळ जागा, दलदलीचे प्रदेश, गवताळ भाग आणि पाणवनस्पतींनी व्यापलेल्या परिसरात वावरणारा लहान आकाराचा जलपक्षी आहे. त्याचे राखाडी रंगाचे शरीर, तपकिरी पंखांवरील ठिपके, लालसर डोळे आणि हिरवट चोच ही त्याची प्रमुख ओळख आहे. हा पक्षी प्रामुख्याने युरेशियातील काही भागांत प्रजनन करतो आणि हिवाळ्यात भारतासह उबदार प्रदेशांकडे स्थलांतर करतो. मात्र, या पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. पक्ष्यांच्या जवळ जाणे, मोठ्या आवाजात बोलणे, त्यांना उडवून लावणे किंवा त्यांच्या अधिवासात अडथळा निर्माण करणे टाळणे गरजेचे आहे. छायाचित्रण करताना सुरक्षित अंतर राखणे ही प्रत्येक छायाचित्रकाराची जबाबदारी असल्याचे पक्षीपप्रमींमधून बोलले जात आहे.
नैसर्गिक जागा सुरक्षित राहणे गरजेचे
नवी मुंबईच्या वेगाने होणाऱ्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर टी.एस. चाणक्य परिसरातील पाणथळ जागांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हिवाळ्यात येथे विविध प्रकारचे बदक, पाणकोंबड्या, किनारपट्टीवरील पक्षी तसेच इतर जलपक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकारांसाठी हा परिसर पर्वणी ठरत आहे. त्यामुळे परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या या पक्ष्यांसाठी अशा नैसर्गिक जागा सुरक्षित राहणे गरजेचे आहे. पक्ष्यांच्या आगमनामुळे नवी मुंबईच्या जैवविविधतेचे दर्शन घडत असून, हा निसर्गाचा अनमोल ठेवा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.
