। माणगाव । प्रतिनिधी ।
तालुक्यातील तळाशेत केंद्रातील सर्वं जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा इंदापूर येथील नंदाई फार्म हाऊस येथे नुकताच मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या मेळाव्याला लहानग्यांनी व त्यांच्या पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता करण्यात आली. उद्घाटन प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख गणेश ढेपे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले.
मेळाव्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गाणे व नृत्य तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश होता. मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र मंच उपलब्ध करून देण्यात आला. तसेच निसर्गाच्या सानिध्यात सर्व मुलांना व पालकांना यानिमित्त स्नेहभोजन देण्यात आले. दुपारनंतर वॉटर पार्कमधील राईडचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
मेळाव्याचे आयोजन केंद्रप्रमुख गणेश ढेपे व केंद्रातील सर्वं शिक्षकांनी एकत्रितपणे केले होते. यावेळी सूत्रसंचालन शिक्षक प्राजित पवार व गायकवाड यांनी केले. सर्वं सहभागी शाळांना यावेळी केंद्रप्रमुख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजकांनी या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन करण्याचे आश्वासन दिले.