राऊत-कदमांमध्ये आरोपांच्या फैरी
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात सध्या अंधश्रद्धेच्या राजकारणाने जोर धरला आहे. संजय राऊतांनी केलेले विधान आणि त्यावर रामदास कदमांनी केलेला पलटवार यावरून चर्चेला उधाण आले आहे. राज्यात नवं सरकार येऊन दोन महिने झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का गेले नाहीत, असा सवाल करत संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर रामदास कदमांनी उत्तर दिले. रामदास कदम म्हणाले की, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडून वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू सापडले असं एकनाथ शिदेंनी म्हटलं होते. काळी जादू काय ते राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे, कारण त्याचा अनुभव संजय राऊतांना जास्त असेल म्हणून त्यांच्या डोक्यात काळी जादूचं आलं असावं, असा पलटवार रामदास कदमांनी केला.
रामदास कदमांच्या या उत्तरावर राऊतांनीही टोला लगावला. रामदास कदम हे काय स्वामी नाहीत त्यांचं ऐकायला, मुळात काळ्या जादूविषयी कुणी बोलायचे… ही अंधश्रद्धा आहे. जर असं कुणी बोलत असेल तर त्यांच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बोलायला हवं. देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत. याचे उत्तर रामदास कदमांनी द्यावे किंवा एकनाथ शिंदे, भाजपा प्रवक्त्याने द्यावी, असं संजय राऊतांनी म्हटलं. वर्षा बंगल्यात काय घडवलंय? त्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कुटुंब वर्षा बंगल्यावर राहायला जायला का घाबरतायेत, हा साधा प्रश्न आहे. तिथे मिरच्या, लिंबू आहेत, असं मी काही म्हटलं नाही. वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. फडणवीस अद्याप बंगल्यात गेले नाही. रात्री तिथे झोपायला जात नाही. तुम्ही कसला भीताय?. तिथे काय घडलंय किंवा याआधी घडवलंय हा महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्रीपद आणि वर्षा बंगला ही पत आहे. मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यावर जावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते. परंतु पहिल्यांदाच असं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात पाय ठेवत नाहीत. अमृता वहिनींना तिथे जावं वाटत नाही. हे काय चाललंय, अनामिक भीतीमुळे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बदलायचं चाललंय, हा बंगला पाडून नवीन बांधण्याचा ठरवला आहे. खोदकाम करून पुन्हा नवीन बांधला जाणार आहे, अशी माहिती माझ्याकडे आहे, असा दावाही संजय राऊतांनी केला.