वाहतूक कोंडीसह धुळीने गुदमरतोय जीव
। कोलाड । वार्ताहर ।
गेली चौदा वर्षे सरकारच्या बेजबाबदारपणाच्या धोरणांमुळे तसेच, ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याचे चित्र आहे. पेण ते महाड दरम्यानच्या कामाला मागील लोकसभा निवडणुकीआधी कोलाड नाक्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला जोरदार सुरूवात करण्यात आली. कामात चांगली प्रगती केली मात्र त्याच कामाला मागील महिन्यापासून दिरंगाई होत गेली. त्यामुळे महामार्गालगतचे गाव, ग्रामस्थ, हॉटेल, भाजी, किराणा, व्यवसायिक, दुकानदारांसह प्रवासी नागरिक हतबल झाले असून दिवसेंदिवस येथील नागरिकांना मार्गावरून होत असलेली वाहतूक कोंडी आणि प्रदूषित होणारी धूळ याला सामोरे जावे लागत आहे.
उड्डाण पूल आणि सर्व्हिस रोडसाठी खोदकामे सुरू केली. यामुळे कोलाड नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी तर बाजारहाटासाठी आलेल्या नागरिकांची मोठी दमछाक होत असल्याने कोलाड आंबेवाडी नाका अक्षरशः या वाहतूक आणि धुळकोंडीमुळे जीव गुदमरत आहे.
गेली चौदा वर्ष या मार्गाचा वनवास कोकणातील विशेषतः रायगडकर प्रवासी निमूटपणे सहन करत आहेत. याचे दुःख सांगावे कोणाला हेच कळत नसल्याने या मार्गाची त्यावरील सर्व्हिस रोड, गटारे, नदीवरील पूल मार्गाच्या साईडपट्ट्या अधूनमधून सोडलेले काँक्रिटीकरण तसेच सुकेळी खिंड, खांब, पुई, तिसे तळवली, रातवड येथील मार्गाची कामे तसेच, पादचारी पुलाचे काम आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. पुई येथील महिसदरा नदीपात्रातील पुलाचे काम अपूर्ण आहे. त्यात आता चक्क कोलाड आंबेवाडी नाक्यावरील चौकातील मार्गाच्या उड्डाणपुलाचे काम ठप्प असल्याने मेन मार्ग खोदकाम सुरू आहे. काही बनवलेले सर्व्हिस रस्ते व गटार लाईनची कामेदेखील अपूर्ण अवस्थेत असल्याने नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने येथील प्रवासी नागरिक तसेच व्यवसायिक दुकानदार यांची मोठी दमछाक होत असताना दिसत असून हॉटेल व्यवसायिक व चहा वडापाव विक्रत्यांवर संक्रात ओढवली आहे. धुळीवर ठेकेदाराकडून पाण्याचा मारा केला जात आहे. मात्र, चिखलातून प्रवास धोक्याचा होत असल्याने अपघाताची समस्या ओढवली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
कोलाड नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम ठप्प आहे. चालू कामाकरीता वाहतूक कमकुवत बनविलेल्या सर्व्हिस रोड मार्गाने होत आहे. जड अवजड वाहनांची वाहतूक तसेच, त्याला जोडला गेलेला रोहा मार्ग त्यामुळे भर चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हे काम किती महिने की किती वर्ष चालत राहणार आहे. या मार्गाला लागून बनविलेले सर्व्हिस मार्ग हे अरुंद अवस्थेत तर काही ठिकाणी मातीचा भराव केला आहे. त्यामुळे बाजारात ये-जा करणार्या प्रवासी नागरिकांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
– मंगेश सानप
सामजिक कार्यकर्ते