एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प
| पनवेल | प्रतिनिधी |
मोरबे धरणाभोवती आता एक लाख बांबू वृक्षाच्या लागवडीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्य सरकारने येत्या काही वर्षात राज्यभर 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट समोर ठेवले आहे. वेगवेगळ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा तसेच ग्रामपंचायतींमार्फत हे उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या मोठ्या योजनेचा एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने मोरबे धरणाभोवती बांबू लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
खालापूर तालुक्यात असलेले मोरबे धरण हे महापालिकेच्या मालकिचे असून, या धरणाभोवती विस्तीर्ण अशी जागा वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध करता येईल असा अहवाल वृक्ष प्राधिकरणाने दिला आहे. त्यानुसार याठिकाणी कोणत्या वृक्षांची लागवड करता येईल याचा अभ्यास मध्यंतरी करण्यात आला. राज्य सरकारने आखलेले 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पुर्ण व्हावे यासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे मोरबे धरण क्षेत्रात एक लाख बांबू वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे.
गावठाणाभोवती बांबू लागवड
धरण क्षेत्र परिसरात मुख्य धरणाच्या भिंतींच्या खाली बांधण्यात आलेल्या भिंतीच्या भोवताली बांबू वृक्षांची लागवड केली जाणार आहे. धरणालगत असलेल्या गावठाणांच्या हद्दीलगत महापालिकेने यापूर्वीच भिंतीची उभारणी केली आहे. या भिंतींच्या कडेला बांबू वृक्षांची लागवड करणे शक्य आहे, असा अहवाल उद्यान विभागाने दिला आहे. याठिकाणी बांबूची लागवड केल्यास एक नैसर्गिक कुंपणभिंत तयार होईल आणि हा संपूर्ण परिसर हरित होईल. तसेच धरण क्षेत्रातील सौदर्यात आणखी भर पडू शकेल, अशी माहिती या प्रस्तावात देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पावणे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत धरण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी वृक्ष लागवडीसाठी 12 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.







