। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात 21 गणपती येथील पंचक्रोशीत नुकत्याच आयोजीत केलेल्या 11 गावांच्या सभेत दोन महत्वपूर्ण व एकमताने निर्णय घेण्यात आले. लग्नामध्ये दारू व डिजेला बंदी असा एकमुखी व ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होतेय.
या सभेमध्ये समाजहिताच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. वाढती महागाई, तसेच कोरोनामुळे लोकांच्या रोजगारावरही गदा आल्याने आर्थिक परस्थीती कोलमडली आहे. गोरगरीब कुटुंब हतबल झाले असून त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. लग्नकार्यात आर्थिक दृष्ट्या सधन व सक्षम असलेले लोक दारू पोटी लाखो रूपये उडवतात. मात्र याचा परिणाम गरिबांवर होतो. लाजे पोटी गरिबांना हि कर्ज काढून दारू ठेवावी लागते. नाहक पैसा जातो. याचा मराठा समाजाने सारासार विचार करून सिध्देश्वर भार्जे पंचक्रोशीतील लोकांनी जनरल सभा घेऊन सर्वांनुमते निर्णय घेतला, 11 गावात लग्न समारांभात दारू बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
मालकाने दारू दयायची नाही, एखादा व्यक्ती दारू पिऊन आल्यास त्याला मालक जबाबदार राहणार नाही. दारू पिऊन वादविवाद तंटा पाहूण्यांनी केल्यास गाव कमिटीने पाहूण्यांना समजावून विषय शांततेच्या पध्दतीने मिटवावा. दारू पिऊन येणार्यांना जरी कोणी रोखू शकत नसले तरी अशा लोकांना शांत राहण्याचा सल्ला मालकाने द्यावा अशा प्रकारे जनरल सभेत विषय मंजूर झाले, या निर्णयामुळे गरिब कुटुंबाने आनंद व्यक्त करून मराठा समाज कमिटी व सदस्य व श्री क्षेत्र एकवीस गणपती विश्वस्त मंडळ कमिटी व ग्रामस्थांचे आभार मानले. याच बैठकीत लग्नात डिजे बंदीचा निर्णय घेतला गेला.
या जनरल सभेस मराठा समाज 21 गणपती सिध्देश्वर भार्जे विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष रमेश साळंके, अमृत पोंगडे, गणेश दळवी, शंकर शिंदे, गणपत सितापराव, चंद्रकांत चव्हाण, विश्वनाथ कदम, दगडू कदम, सतिश खाडे, मारूती हरी यादव, सखाराम राजिवडे, सागर अजिवळे, प्रकाश कदम, नथुराम भोईर.अशिष यादव, गणपत तेलंगे, महिपत जांभूळकर, वामण कालेकर, गणपत चव्हाण, महादू दळवी, दिपक जाधव, गोपाळ सावंत, यशवंत घोलप, मंगेश यादव, राजू दळवी, दगडू कदम, पुई, समस्त 11 गाव ग्रामस्थ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शांततेत सभा पार पडली.