बांगलादेशचा संघ जाहीर
। ढाका । वृत्तसंस्था ।
शकिब अल हसनची पुन्हा कर्णधारपदी नियुक्ती केल्यानंतर बांगलादेशने या महिन्याअखेरीस होत असलेल्या आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले, तमिमच्या निवृत्तीनंतर बांगलादेशच्या कर्णधारपदासाठी शाकिबला पहिली पसंती होती. आशिया चषक आणि विश्वचषक यांसारख्या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेत असताना त्याची उत्कृष्ट कामगिरी, अनुभव आणि नेतृत्वगुण संघाला प्रेरणा देतील याची मला खात्री आहे.
गेल्या वर्षी कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शकीब आता तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचा कर्णधार आहे. 36 वर्षीय खेळाडूने यापूर्वी 2009 ते 2017 दरम्यान बांगलादेशचे 52 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे, ज्यात 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने 23 एकदिवसीय सामने जिंकले, तर 26 वेळा पराभव पत्करावा लागला. भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणारा पुरुष एकदिवसीय विश्वचषक हे संघापुढील सर्वात मोठे आव्हान असेल. जिथे बांगलादेश 7 ऑक्टोबरला धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
तमिम इक्लाब दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याने रिक्त झालेल्या त्याच्या जागेवर तान्झिद हसन आणि मोहम्मद नईम यांच्यात चुरस होती. तान्झिदने गेल्या दोन वर्षांत फार चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच संपलेल्या इमर्जिंग आशिया करंडक स्पर्धेतही त्याने ठसा उमटवला होता. तो आक्रमक शैलाची फलंदाज आहे. त्याला सुरवात संघासाठी मोलाची ठरू शकेल, असे मत बांगलादेश निवड समितीचे अध्यक्ष मिनहाजुल अबेदिन तान्झिदच्या निवडीबाबत म्हणाले.
अनुभवी फलंदाज मोहमदुल्ला याला वगण्यात आले आहे. गेल्या मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलेले आहे. सराव शिबिरासाठी पाचारण करण्यात आल्यानंतरही मोहमदुल्लाची निवड करण्यात आली नाही. मोहमदुल्लाच्या निवडीबाबत प्रदीर्घ चर्चा झाली; परंतु संघ व्यवस्थापनाने भविष्यातील प्लान सादर केला. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून आम्ही मोहमदुल्लाला वगळले असे, अबेदिन यांनी सांगितले. आशिया करंडक स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. बांगलादेशचा ब गटात समावेश करण्यात आला असून त्यांचा सलामीचा सामना सहयजमान श्रीलंकेशी होणार आहे.
संघ शकिब अल हसन (कर्णधार), लिटॉन दास, तान्झिद तमिम, नजमुल हुसैन शांतो, तौहित हरिदोय, मुशफिकर रहिम, मेहही हसन, तस्किन अहमदा, मुस्तफिझुर रेहमान, हनस महमूद, शेख मेहदी, नसुम अहमद, शामिम हुसैन, अतिफ हुसैन, शोरिफूल इस्लाम, इबादोद हुसैन, नइम शेख. राखीव तईजुल इस्लाम, सैफ हसन, तान्झिम हसन सकिब.