| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणांच्या दोन गटांमध्ये दि.11 रोजी तुफान हाणामारी झाली. गेटवर खेचून आणत जमिनीवर पाडून मारण्याचा प्रकार घडला आणि नंतर त्यातील एकाने लोखंडी फायटरचा वापर करून डोक्यात गंभीर दुखापत करण्याची घटना घडली.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत नेरळ विद्या मंदिर कॉलेजचे गेटसमोर कोलीवली गावातील तरुणाचा मामा हा कोल्हारे गावातील काही तरुण यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत होता. कोलीवली गावातील विद्यार्थ्याला कोल्हारे गावातील विद्यार्थ्याने मारण्याची धमकीचे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तो तरुण करीत होता. मात्र, वाद मिटवून घ्या या गोष्टीचा राग आल्याने कोल्हारे गावातील नऊ तरुणांनी कोलीवली गावातील 17 वर्षीय तरुणाला कॉलेजच्या गेटवरून खेचून बाहेर आणले आणि जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एका तरुणाने कोलीवलीतील तरुणाच्या डोक्यात आणि गालावर लोखंडी फायटरने मारहाण केली.
या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, कोल्हरे गावातील नऊ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी घटनास्थळी जाऊन विद्यार्थ्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. या घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुरेश मोरे करीत आहेत.