। ब्रिस्बेन । वृत्तसंस्था ।
सहयजमान ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटवर कडव्या प्रतिकारानंतर 7-6 असा पराभव केला आणि महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठला. पूर्ण वेळेत हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. ऑस्ट्रेलियाच्या या थरारक विजयाची शिल्पकार ठरली ती गोलरक्षक मॅकेन्झी अरनॉल्ड. पेनल्टी शूटआऊटमध्ये तिने फ्रान्सच्या तीन पेनल्टी पेनल्टी अडवल्या. तिच्याकडून एक प्रयत्न अपयशी ठरला. त्याच वेळी विकी बेचो हिने या पेनल्टी शूटआऊटमधील 12 वी किक यशस्वीपणे गोलजाळ्यात मारली आणि ऑस्ट्रेलियासाठी विजयाचा मार्ग मोकळा झाला.
या कामगिरीवर माझा विश्वासच बसत नाही. शेवटी गोलजाळ्याच्या दिशेने येणारा चेंडू अडवणे, हे माझे कर्तव्य होते, यात मला यश आले. माझे मनोबल उंचावण्यात सहकार्यांचा वाटा सर्वाधिक आहे, असे मत ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक अरनॉल्ड हिने व्यक्त केले. उपांत्य फेरीचा आणखी एक सामना स्पेन आणि स्वीडन यांच्यात ऑकलंड येथे होणार आहे.
2011 नंतर फ्रान्सचा संघ दुसर्यांदा उपांत्य फेरीसाठी प्रयत्नशील होता. अखंड डावाच्या पूर्वार्धात आणि जादा डवात गोल करून मोहीम फत्ते करण्याची संधी त्यांना मिळाली होती; परंतु या संधी त्यांनी वाया दवडल्या. सर्व प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला पाठिंबा देत असलेले वातावरण असतानाही आमच्या खेळाडूंनी झुंझार खेळ केला. त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करत आहे, अशी भावना फ्रान्सचे प्रशिक्षक हेर्वी रेनार्ड यांनी व्यक्त केले.
हा सामना फारच चुरशीचा झाला. अखंड डाव, जादा डाव आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊट… खेळाडूंच्या क्षमतेचा कस पणाला लागला होता, असे रेनाल्ड यांनी सांगितले. 12 व्या मिनिटाला फ्रान्सच्या मेईली लाकरार हिच्याकडे तर कॉर्नरवर गोल करण्याची सुवर्णसंधी होती; पण ती वाया घालवली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मेरी फ्लॉवरनेही अशीच संधी गमावली होती.