रायगडात बाप्पांचे उत्साहात विसर्जन
अलिबाग | विषेश प्रतिनिधी |
भक्तिमय वातावरणात दहा दिवस विराजमान झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाना रायगड जिल्ह्यात रविवारी भावपूर्ण निरोप देत पुढल्या वर्षी लवकर या असे आवाहन करण्यात आले. 160 सार्वजनिक तर, 17 हजार 195 खासगी बाप्पांना शांततेत निरोप देण्यात आला. कोरोना नियमामुळे ना ढोल,ना ताशा,फक्त मुखातून येणारा बाप्पा मोरयाचा गजर…बाकी सर्वत्र निरव शांतता असे वातावरण विसर्जनावेळी दिसून आले.
शहरी भागात शांततेत तर ग्रामीण भागात उत्साहात विसर्जन करण्यात आले. विसर्जना प्रसंगी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली होती त्यामुळे कुठेही अनुचित प्रसंग घडल्याची नोंद नाही. अलिबाग नगर पालिका प्रशासनाने बाप्पाच्या मूर्तींच्या विसर्जनाची जबाबदारी घेतली असल्याने निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले.
गेले दहा दिवस जिल्ह्यात बाप्पाच्या आगमनाचा चांगलाचा जल्लोष होता. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी बाप्पाच्या उत्सवावर कोरोनाचे कमी सावट होते. त्यामुळे बाप्पाचा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करता आला आहे. कोरोना कालावधीत गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने विसर्जन मिरवणूकांवर बंदी घातली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघाल्या नाहीत.
विर्सजन स्थळी गेल्यावर बाप्पाची मूर्ती संबंधीत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येत होती. तेथील कर्मचारी बाप्पाच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करत होते. अलिबाग समुद्र किनारी अलिबाग नगर पालिकेने चांगली व्यवस्था केली होती. त्यामुळे गणेश भक्तांनी विसर्जनासाठी समुद्राच्या पाण्यात उतरु नये असे आवाहन नगर पालिकेने केले होते. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.