बाप्पांची नगरी बॅनरबाजीमुळे विद्रुप

| पेण | प्रतिनिधी |

गणपती मुर्तीचे माहेरघर आणि पापड उद्योगासाठी प्रसिध्द असणारे पेण शहर बॅनरबाजीमुळे विद्रुप झाले आहे. गेल्या सात महिन्यात फक्त 11 जणांनीच नगर परिषद प्रशासनाकडून बॅनर लावण्यासाठी परवनागी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उर्वरीत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे पेण पालिका स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे काम करत आहे. शहरातील स्वच्छतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवून जनजागृतीसाठी लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, दुसरीकडे याच स्वच्छता अभियानाकडे पाठ फिरवून अनेक जाहिरातदार पेण पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे बॅनरबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करत आहेत.

पेण शहरात शेकडो जाहिरातींचे बॅनर्स झळकत आहेत. त्यावरून खऱ्या अर्थाने पालिकेला लाखो रुपयांचा कर उपलब्ध होणे क्रमप्राप्त होते, मात्र आर्श्चयाची बाब म्हणजे पेण पालिकेला मागील सात महिन्यात फक्त आकरा जाहिरातदारांच्या माध्यमातून अवघे 39 हजार 380 रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. राजकीय पुढारी तसेच शैक्षणिक क्लासेस चालवणारे बेधडकपणे जाहिरातीचे बॅनर लावत आहेत. राजकीय पुढारी तर वाढदिवसाला 10 ते 15 दिवसा अगोदरच बॅनर लावून स्वतःचीच जाहिरात करताना दिसतात. हुतात्मा स्मारक ठिकाणी देखील बॅनर लावण्यात आले आहेत.
यामध्ये मोठया प्रमाणात नगरपालिकेचा महसुल बुडविला जात आहे. त्यामुळे या शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या आणि शासकीय नियम धाब्यावर बसवून पालिकेचा कर बुडवणाऱ्या जाहिरातदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पेण शहरातून होत आहे.

पेण शहरामध्ये अनधिकृत बॅनर लावण्याला सर्वस्वी जबाबदार हे नगरपालिकेचे अधिकारी आहेत. अधिकारी मनमानेल तसे बॅनर लावणाऱ्यांकडून कर आकारत आहेत. याबाबत कोणतीही नियमावली तयार करण्यात आलेली नाही. प्रशासन पुढाऱ्यांच्या विरुध्द कारवाई करताना दिसत नाही. राजकीय पुढारी आठ ते दहा दिवस अगोदर आपले बॅनर लावून शहराच्या विद्रुपीकरणात भर पाडत आहेत. बॅनर प्रिंटीग करणाऱ्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर कारवाई करणे म्हणजे चोर सोडून सन्यांशाला पकडण्याचा प्रकार आहे. स्वत:च्या चुका लपवण्यासाठी बॅनर प्रिंटींग व्यवसायिकांना जबाबदार धरू नये, अशी मागणी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी केली आहे.

पेण शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर्स लावले जात आहेत. वेळोवेळी कारवाई केली जात आहे. मात्र हे अनधिकृत बॅनर्सचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. आम्ही तातडीने पुन्हा एकदा अतिक्रमण विभागाला कारवाईचे आदेश देत असुन पेण शहरात ज्या बॅनर्स बनविण्याच्या प्रिंटिंग मशिन आहेत त्यांना सुद्धा जोपर्यंत पालिकेत कर भरल्याची पावती जाहिरातदार दाखवणार नाही तोपर्यंत बॅनर्स प्रिंट करण्यात येऊ नये अन्यथा त्यास तुम्ही जबाबदार असाल अशा प्रकारची नोटीस देखील तातडीने काढत आहोत.

सुहास कांबळे, नगर अभियंता पेण न. पा.
Exit mobile version