| पुणे | वृत्तसंस्था |
पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख सुरुच असताना आता बारामतीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. बारामतीमध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे टीसी कॉलेज परिसर आणि बारामधीमध्ये खळबळ उडाली. कॉलेजमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तर विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 30) सकाळी अकराच्या सुमारास एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सदर विद्यार्थी जखमी झाला होता, त्यानंतर त्याला दवाखान्यात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर महाविद्यालयाच्या आवारात तातडीने पोलिसांना बोलविण्यात आले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याबरोबर आणखीन एक युवक यात सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यामध्ये दोन्ही अल्पवयीन मुले असून ज्या विद्यार्थ्यांचा खून झाला, तो देखील अल्पवयीन असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी सांगितले. एक महिन्यापूर्वी पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा मनात राग ठेवून हा हल्ला करण्यात आला, असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यासंदर्भात पोलिसांनी संबंधित युवकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.