| रोहा | प्रतिनिधी |
छ. शिवाजी महाराज नगर येथील प्रवेशद्वाराजवळील महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरभोवती अखेर बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा ट्रान्सफॉर्मर कोणत्याही संरक्षक अडथळ्याविना खुल्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
विशेषतः ट्रान्सफॉर्मरच्या अगदी जवळच नगरपालिकेची शाळा असल्याने शाळेत ये-जा करणाऱ्या तसेच मधल्या सुट्टीत बाहेर पडणाऱ्या लहान मुलांचा या परिसरात वावर होत असे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणने अखेर या ट्रान्सफॉर्मरभोवती बॅरिकेड्स उभारून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता अधिकृत कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना ट्रान्सफॉर्मरच्या परिसरात सहज प्रवेश करता येणार नाही. भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. या कामासाठी अजित मोरे, पूर्वा मोहिते, नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. उशिरा का होईना, पण महावितरणने ट्रान्सफॉर्मरला बॅरिकेड्स लावून घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. विशेषतः शाळेजवळ असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. महावितरण आणि यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे येथील सजग नागरिक पराग बनकर यांनी विशेष आभार मानले आहेत.






