| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी मायदेशातील 88 सामन्यांच्या प्रसारण हक्काच्या विक्रीचा उच्चांक गाठणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रसारण हक्कांमध्ये ‘टीव्ही’ आणि ‘डिजिटल’ असे दोन स्वतंत्र अधिकार दिले जाणार आहेत. या दोन्ही हक्कांची एकत्रित विक्री अंदाजे 8200 कोटी रुपयाला होईल असे मानले जात आहे. हे अधिकार मार्च 2028 पर्यंत असतील. या नव्या 88 सामन्यांच्या वेळापत्रकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील सर्वाधिक 21 सामन्यांचा (पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि 10 ट्वेन्टी-20) समावेश आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध भारत 18 सामने (10 कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-20) खेळणार आहे. यामध्ये एकूण 25 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 36 ट्वेन्टी-20 सामन्यांचा समावेश आहे.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत बीसीसीआयने स्टार इंडियाफकडून अंदाजे 6138 कोटी रुपये इतका महसूल मिळवला होता. यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हक्क 60 कोटी रुपयांना विकले गेले होते. आयपीएलफमध्ये डिजिटल आणि टीव्ही अशा दोन्ही अधिकारांसाठी स्वतंत्र बोली लावण्यात आली. यामधून बीसीसीआयला 48,390 कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. हा बदल यशस्वी ठरल्यानंतर आता बीसीसीआय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या प्रसारण अधिकारांसाठी देखील स्वतंत्र बोली लावणार आहे.डिजिटल व्यवहारांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता भारतात डिजिटल अधिकार सर्वाधिक किमतीला विकले जातील, असे मानले जात आहे. टीव्हीला मिळणारा प्रतिसाद तुलनेत कमी असेल असेही बोलले जात आहे.
..तर, झी देखील शर्यतीत
प्रसारण हक्कांच्या खरेदीत निविदांची 15 लाख रुपयांची कागदपत्रे तीन कंपन्यांनी खरेदी केली आहेत. यामध्ये ‘डिस्ने-स्टार’, ‘रिलायन्स- वायकॉम’ यांचा समावेश आहे. सप्टेंबपर्यंत ‘सोनी’ आणि ‘झी’ यांच्यात विलीनीकरणाचा करार पूर्ण झाल्यास झी देखील यामध्ये उडी घेऊ शकते.