सावधान! ओमिक्रॉन आलाय ‘या’ लक्षणांसोबत…

। अलिबाग । वार्ताहर ।
कोरोनाचे रूग्ण कमी झाल्याने मुख्यमंत्र्यांनी निर्बंधांमध्ये शिथिलता जाहीर केली होती. आणि त्यानंतर नागरिकांमध्ये कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभ्रम असतानाच आता ओमिक्रॉन या नव्या व्हायरसचा मारा होत आहे. मुंबईत आतापर्यंत 14 जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला आहे. सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील 13 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याचदरम्यान, ओमिक्रॉनची नेमकी लक्षणे काय आहेत, याची माहिती या रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयातओमिक्रॉनसंसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रूग्णांमध्ये काही लक्षणे आढळून आली आहेत. त्यात काही प्रमाणात घशात खवखव, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणे प्रामुख्याने रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. अंधेरीतील रुग्णालयात ओमिक्रॉनबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असून, आतापर्यंत 14 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यातील 13 रुग्णांना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

मुंबईत आढळलेल्या 14 रुग्णांपैकी आठ जणांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तर ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली, त्यात प्रामुख्याने घशात खवखव, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणे दिसून आली, असे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. या व्यतिरिक्त त्यांच्यात कोणतेही आजार दिसून आलेले नाहीत. फुफ्फुसावर कोणताही परिणाम झालेला नव्हता, असे तपासणी अहवालात दिसून आले आहे. याचाच अर्थ साधारण ताप आणि अंगदुखीवर औषधोपचार करण्यात आले. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांना मल्टिव्हिटॅमिन देण्यात आले, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत 32 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, ओमिक्रॉनच्या 50 टक्के रुग्णांमध्ये एकही लक्षण आढळून आलेले नाही. पहिल्या दिवशी रुग्णाला सौम्य ताप, सर्दी आणि खोकला ही लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात. विशेष म्हणजे, वास न येणे हेकोविड 19चे लक्षण असले तरी, ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये हे लक्षण आढळून आले नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. महाराष्ट्रात आढळून आलेल्या 32 रुग्णांमधील 25 रुग्णांचे लसीकरण झालेले आहे. तर यातील पाच हे अल्पवयीन आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Exit mobile version