। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा मार्गावर गेले पाच ते सहा दिवस अज्ञातांकडून मारहाण होत असल्याची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या मार्गावरुन प्रवास करताना अज्ञात व्यक्ती बाईकवरुन येत चाबुक किंवा लाकडाने पाठीमागून हल्ला करीत असल्याची चर्चा जोर धरीत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वृत्ताबाबत स्थानिकांसमवेत चर्चा केली असता, ग्रामस्थांवर हल्ला केला जात असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. तसेच स्थानिक, पर्यटक यांनी रात्रीच्या सुमारास या मार्गावरुन प्रवास न करण्याचा सल्ला स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत चौकशी केली असता मापगाव, मुनवली, बहिरोळे, टाकादेवी आदी गावांतील नागरिकांना मारहाण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
आरोपींना तातडीने जेरबंद करा
मुंबई-पुण्यातील अनेक पर्यटक किहिम, मांडवा आदी ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. ही घटना खरी असल्यास पर्यटकांसोबत अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या वृत्ताची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. हे वृत्त खरे असल्यास त्यांना तातडीने जेरबंद करणे गरजेचे आहे.
वैभव पाटील, ग्रामस्थ
या घटनेमुळे परिसरातून रात्रीचा प्रवास करणे कठिण झाले आहे. सायंकाळी साडेसात नंतर या घटना घडत आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गेले दोन दिवस टाकादेवी, परहूरपाडा गावातील युवकांच्या मदतीने पाळत ठेवण्यात येत आहे. मात्र आरोपी हाती लागला नाही. त्यामुळे लवकरचे पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये एसटी कर्मचारी, आदिवासी व एका जोडप्यालाही मारहाण झाली आहे.
विजय थळे, ग्रामस्थ
