| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे तरुणाला मारहाण करून त्याचा महागडा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेत फोन-पेच्या माध्यमातून बँक खात्यातून 5 हजार रुपये काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण 1 लाख 84 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बासुद्दीन मोहम्मद अल्लाउद्दीन (32) हे जेवणासाठी जात असताना पळस्पे ते जेएनपीटी महामार्गालगत करंजाडे परिसरात आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील 59 हजार 999 रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. तसेच, मोबाईलमधील फोन-पे ॲपचा पासवर्ड जबरदस्तीने मिळवून त्यांच्या बँक खात्यातून 5 हजार रुपये काढून घेतले. अशा प्रकारे एकूण 64 हजार 999 रुपयांची लूट करण्यात आली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस पथकाने औस सलमान मुकादम (25), हमजा उर्फ गोलू तस्लीम शेख (23) आणि आवेश जाबीर मालदार (27) या तिघांना अटक केली व पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख रुपये किमतीची मोटारसायकल, 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल, 3 हजार रुपये रोख रक्कम, 59 हजार 999 रुपये किमतीचा चोरीस गेलेला मोबाईल आणि 2 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 84 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मारहाण करून मोबाईल हिसकावला
