प्रशांत साबळे यांची सामाजिक बांधिलकी
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरातील खांदाड गाव परिसरात प्रशांत साबळे यांनी मोरबा रोडवरील गोद नदीकाठी दुतर्फा सिमेंटचे बाकडे बसवून ज्येष्ठांना दिलासा दिला आहे.
निसर्गरम्य गोद नदी परिसर आणि त्यालगत जाणारा पुणे-माणगाव-दिघी महामार्ग हा परिसर सौंदर्याने नटलेला असला, तरी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची कोणतीही सोय नव्हती. रोज सकाळ-संध्याकाळ आरोग्यासाठी चालायला येणाऱ्या वयोवृद्धांना थकवा आल्यावर विश्रांती घेण्यासाठी जागा नव्हती. ही गरज लक्षात येताच साबळे यांनी कोणतीही विलंब न करता स्वतःच्या खर्चातून चार सुसज्ज बाकडे उभारून ज्येष्ठांच्या आयुष्यात एक छोटासा पण मोलाचा आधार दिला. या परिसरातून रीळे, पाचोळे, निळगूण आणि मोरबा गावांतील अनेक नागरिक दररोज ये-जा करतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बाकडे म्हणजे थकलेल्या पावलांना दिलासा देणारी सावली ठरली आहेत. आता चालताना दम लागला, तर विश्रांतीसाठी एक हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.
