एक रुपयात मिळणार पीक विम्याचा लाभ

31 जुलै अंतिम तारीख

| पाताळगंगा | वार्ताहर |

खरीप हंगाम 2023 ते 2024 पासून शासनाने पीक विमा योजना लागू केली असून, शेतकर्‍यांना एक रुपयात पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. शेतकर्‍यांनी प्रति अर्ज फक्त एक रुपया भरावयाचा आहे. एक रुपया वगळता उर्वरित विमा हप्त्याची शेतकरी हिस्स्याची रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. सदर योजना ही 2023-24 पासून 2025 -26 या तीन वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर क्षेत्र, भूस्खलन, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादींमुळे उत्पन्नात होणारी घट. वरील कारणांमुळे नुकसान होऊन पीक उत्पादनात घट झाल्यास शेतकर्‍यांना पिक विमा लागू होईल. रायगड जिल्ह्यासाठी सदरची योजना चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. विमा योजनेत सहभागासाठी पीक विमा पोर्टल 1 जुलैपासून कार्यान्वित झाले आहे. या योजनेत सहभागासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख असून, जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, खालापूर सुनील निंबाळकर यांनी केले आहे.

Exit mobile version