। खांब-रोहा । वार्ताहर ।
येथील विभागीय क्रिक्रेट असोसिएशन व गावदेवी धानकान्हे क्रीडा मंडळ यांच्या वतीने रविवार, दि. 10 रोजी संपन्न झालेल्या विभागीय भव्य क्रिक्रेट स्पर्धेतील अंतिम चुरशीच्या लढतीत भाई भाई खांब संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. रोहा मंडळ अधिकारी चंद्रकांत राऊत व उपसरपंच सूरज कचरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या स्पर्धेस गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, येथील सरपंच वसंत भोईर, युवा नेते नरेंद्र जाधव, मनोज शिर्के, संतोष भोईर, शरद कचरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यशवंत माहीत आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेचा उपविजेता ठरला धाक्सूद चिल्हे संघ, तर तृतीय क्रमांक धाकेश्वर देवकान्हे संघाने पटकावला. स्पर्धेतील सामनावीर म्हणून निलेश टवळे, उत्कृष्ट फलंदाज सनी खांडेकर तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुबोध भोईर यांना तसेच विजयी संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी गावदेवी क्रीडा मंडळ धानकान्हे मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.