गोळाफेक स्पर्धेत भक्ती भोईर प्रथम

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्हा ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप ही स्पर्धा उलवे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या जिल्हास्तरीय स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उ्‌‍दघाटन माजी आमदार तथा ॲथलेटिक्सचे रायगड जिल्हाध्यक्ष बाळाराम पाटील यांनी केले.

याप्रसंगी रायगड जिल्हा ॲथलेटिक्स असोशिएशनचे सचिव प्रवीण खुटारकर, दिलीप पाटील, यतिराज पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा जिओ इन्स्टिट्यूटतर्फे भरविण्यात आली होती. या स्पर्धेत एकलव्य ॲथलेटिक्स अकॅडमी जेएनपीटी -उरणच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलींमध्ये भक्ती विजय भोईर हिने गोळाफेक क्रीडा प्रकारात 8.91 मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर भालाफेक प्रकारात भक्तीने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ओम योगेश पाटीलने गोळाफेक प्रकारात दुसरा क्रमांक पटकविला आहे. तर दिपराज पाटीलने गोळाफेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची नाशिक व रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळाडू राम चौहान, योग शिक्षिका पूनम चौहान, सहाय्यक शिक्षिका गुंजन निसाद, प्रशिक्षक दिपक घरत यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version