। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
आदर्श आचारसंहिता सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथकेअॅक्शन मोडवर आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी हातखंबा येथील तपासणी नाक्याला भेट देऊन वाहनांची तपासणी केली. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सर्व नोडल अधिकारी, विभागप्रमुखांची बैठक घेऊन भरारी पथकांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या होत्या. गोवा बनावटीची दारू, नियमबाह्य रोकड याची वाहतूक होऊ नये याबाबत वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आदर्श आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार, सहाय्यक नोडल शंकर बर्गे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी हातखंबा येथील तपासणी नाक्यावर भेट दिली. येणार्या वाहनांची तपासणी केली.