महायुतीमधील घटक पक्षांमध्ये चुरस; तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेमधून 50 हजारहुन अधिक लाभार्थी महिलांना शासनाकडून अनुदान मिळत आहे. ही योजना महाराष्ट्र शासन राबवत असून राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे सत्तेत आहेत. मात्र, कर्जत मतदारसंघात या तिन्ही पक्षांची वेगेवेगळी भूमिका असल्याने याचा लाभ चौथ्याचा होणार असून या मतदारसंघात लाडकी बहीण कोणाला साथ देणार, यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून राहणार आहेत.
कर्जत विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारची जनाधार लाभलेली ‘लाडकी बहीण योजना’ मोठ्या प्रमाणात राबविली गेली आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपल्यापरीने कर्जत आणि खालापूर तालुक्यात शिबीर भरून जोरदार प्रयत्न केले होते. कर्जत तालुक्यात तब्बल 53 हजार लाडक्या बहिणी शासनाचे 1500 रुपये येत आहेत. मात्र, त्याच लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कर्जतचे विद्यमान आमदार हे शिवसेनेचे असून त्यांनी मोठी मोर्चे बांधणी केली आहे. तसेच, शासनाची ही योजना यशस्वी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोहीम हाती घेतली होती. मात्र, योजनेच्या माध्यमातून लाभ दिलेल्या महिलांच्या संपर्कासाठी कोणतेही मेळावे आयोजित करतांना दिसत नाही. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते अपक्ष किंवा आघाडीमधून लढले तर ते लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा उठवणार, याबाबत अधिकृत उमेदवार यांच्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत.
परंतु, लाडकी बहीण योजना ही राज्यसरकारच्या महिला बालकल्याण मंत्रालयकडून राबविली जात असून निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. भाजपकडून फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रोजेक्ट केले जात आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींचा तारणहार म्हणून पुढे केले जात आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्षांच्या चुरसीचा फायदा चौथाच करून जाणार अशा चर्चा कर्जतमध्ये रंगू लागल्या आहेत. यामुळे कर्जतमध्ये लाडक्या बहिणी आपल्या मतांची ओवाळणी कोणाच्या पारड्यात टाकणार, यावर देखील या मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून आहे.