| अलिबाग | प्रतिनिधी |
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रायगड पोलीस आयोजित जीवनदूत सन्मान सोहळा शुक्रवारी अलिबागमध्ये आयोजित करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आमदार महेंद्र दळवी यांना भरसभेत फटकारले.
दारु पिऊन वाहन चालविणार्यांवर कारवाई झाली पाहिजे. एकाच्या चुकीमुळे अनेकांचा जीव जातो. दारु पिऊन वाहन चालवण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या सर्वच चालकांवर कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांनी कारवाई केल्यास कार्यकर्त्यांनी याबाबत फोन केल्यावर कारवाई करण्यास रोखू नका, असा सज्जड दम दळवींना भरला.
आदिती तटकरे यांच्या अनुपस्थितीने चर्चेला उधाण
रायगड पोलिसांच्या कार्यक्रमाला महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे कायमच उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देतात. परंतु, या सोहळ्याला आमंत्रण देऊनदेखील आदिती तटकरे उपस्थित राहिल्या नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तटकरे विरुध्द शिंदे गटातील गोगावले यांचा पालकमंत्रीपदावरून वाद सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला आदिती तटकरे अनुपस्थितीत राहिल्याने गोगावले आणि तटकरे यांचा वाद आता विकोपाला जाण्याच्या वाटेवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षकांची गैरहजेरी रायगड पोलिसाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यामध्ये मंत्र्यांपासून जिल्हाधिकारी व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकार्यांना आमंत्रित करण्यात आले होते. आमंत्रण पत्रिकेमध्ये कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचे नाव होते. परंतु, या कार्यक्रमाला त्यांची गैरहजेरी असल्याचे दिसून आले. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांना भेटण्याची अनेक कर्मचार्यांची आशा होती. परंतु, ही आशा निष्फळ ठरली.