। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना भीमशक्ती या सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. अलिबाग, मुरूड, रोहा विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने चिऊताई यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी भीमशक्ती ही सामाजिक संघटना आहे. राज्यसभा खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याच्या वतीने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेने ‘शिट्टी’ या निशाणीसमोरील बटण दाबून चिऊताई यांना प्रचंड मतांनी मतदान करून विजयी करा, असे आवाहन भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आले. या पाठिंब्याचे पत्र चित्रलेखा पाटील यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वाघमारे, उपाध्यक्ष अनिल मोहिते, सरचिटणीस राजू रणवीर, जिल्हा संघटक संजय भोसले, रोहा तालुक्यातील रवींद्र दाभणे, सुशील मोहिते, श्रीयश मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. चित्रलेखा पाटील यांना वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे.