ठेकेदाराचा मनमानी कारभार; बायपास रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची गरज
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कोलाड येथील वरसगांव भिरा फाट्यावरील बायपास रस्त्यावर तसेच भिरा फाट्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) टाकण्याची गरज असून, या कामात ठेकेदाराकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा दिसून येत आहे. यामुळे भिरा फाटा हा डेंजर झोन बनला असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील वरसगांव भिरा फाट्यावर महाडकडून मुंबई बाजुकडे येणाऱ्या व मुंबईकडून महाड बाजुकडे जाणाऱ्या मार्गांवर गतिरोधक बसविण्यात आला आहे. तो ही अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत, यामुळे अनेक अपघात घडत आहेत. तर कोलाड कडून भिराकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर गतिरोधक नाही
यामुळे येथे अतिवेगाने येणाऱ्या वाहनांमुळे येथे अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे येथे रस्त्याला गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. परंतु, यांची कल्पना संबंधित ठेकेदार याला दिली असतांनाही येथे गतिरोधक बसविण्यात आले नाही. यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशी नागरिक व प्रवाशी यांच्याकडून करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून वरसगांव भिरा फाट्यावरून ताम्हिणी मार्गी पुणेकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग असून, या मार्गावरून असंख्य खेडेगावातील नागरिक ये-जा करीत असतात. यामुळे या मार्गावर उड्डाण पुलाची आवश्यता होती. परंतु, या ठिकाणी उड्डाणपूल न बनविण्याची गरज का भासली नाही.? का येथील सर्वे डोळे झाकून केला आहे काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या ठिकाणी कमीत कमी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसविणे गरजेचे असून, या संबंधात पत्रकारांनी महामार्ग ठेकेदार यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता ठेकेदार यांनी 31 मे रोजी गतिरोधक करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आज 12 दिवस झाले तरी गतिरोधकाचे काम पूर्ण केले नाही. यामुळे संबंधित ठेकेदारावर प्रशासनाचे कोणतेही वचक नसल्याने ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरु असल्याचे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उड्डाण पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे वाहने बायपास रस्त्यावरून अतिवेगाने जात आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, स्थानिक नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे येथे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी होत असतांना संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार संबंधित ठेकेदार असेल.
डॉ. संजय पाटील,
सामाजिक कार्यकर्ते
