| नेरळ | वार्ताहर |
कर्जत शहरातील भिसेगाव भागात येणाऱ्या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. अजूनही या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित असून रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी विजेचे खांब उभे आहेत. ते खांब गेल्या चार वर्षांपासून काढण्याची मागणी असताना अद्याप काढण्यात आलेले नाहीत. दरम्यान, रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून रस्त्यावरील वाहतूक वाढल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्जत शहरातील भिसेगाव आणि गुंडगे तसेच विश्वनगर भागाकडे जाणारा रस्ता हा कर्जत चारफाटा येथून सुरु होतो. या रस्त्याचे दुपदरीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय कर्जत नगरपरिषदेने चार वर्षांपूर्वी घेतला होता. रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आणि त्यानंतर कोविड मुळे रस्त्याचे काम अडकून तर त्यांनतर पुन्हा काँक्रीटीकरण सुरु झाले असता एका बाजूचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आणि नंतर बिलावरून अनेक महिने दुसऱ्या बाजूचे काँक्रीटीकरण झाले नव्हते. परिणामी हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद होता. मात्र, शेवटी स्थानिक नागरिकांना उपोषण करण्याची वेळ आल्यावर रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता त्या रस्त्यावरील काही कामे अर्धवट असून त्याकडे पालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या बाजूला पेव्हर ब्लॉकने साईड पट्ट्या भरण्याचे काम अर्धवट अवस्थेत असून वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याच्या बाजूने चालताना कसरत करावी लागत आहे.
हा रस्ता पूर्वी साडे पाच मीटर रुंदीचा होता. आता दुपदरी केल्याने पूर्वीच्या रस्त्याच्या बाजूने असलेले विजेचे खांब हे रस्त्याच्या बांधकामात आले. त्यात काही विजेचे खांब तर वाहने धडकलीत अशा स्थितीत उभे आहेत. रस्त्याच्या कामासाठी तब्बल चार वर्षाचा कालावधी लोटला असताना देखील विजेचे खांब आजही रस्त्यामध्ये उभे आहेत. ते विजेचे खांब तेथून बाजूला करण्याची कार्यवाही महावितरण कडून अद्याप करण्यात आलेली नाही. रस्त्यामध्ये असलेली विजेचे खांब बाजूला करण्यासाठी संबंधित कामाचे टेंडर मधील विशिष्ट रक्कम विजेचे खांब बाहुला करण्यासाठी आरक्षित ठेवणे अपेक्षित असते. मात्र विजेचे खांब रस्त्यातून हटवले जात नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांची धडक बसून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






