| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत मधील डिकसळ गावातील शांतीनगर भागासाठी नवीन जलकुंभ साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या कामासाठी उमरोली ग्रामपंचायत कडून 15 वित्त आयोगातील दोन लाखांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, जलकुंभ बांधण्याच्या कामाचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
उमरोली ग्रुप ग्रामपंचायतमधील डिकसळ गावातील शांतीनगर भागासाठी ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेचे पाणी कमी दाबाने येत होते. त्यामुळे शांतीनगर भागातील रहिवाशी आणि रायगड भूषण किशोर गायकवाड आणि ग्रांमस्थ जीवक गायकवाड यांनी शांतीनगर भागासाठी पाणी साठवण टाकी बांधून द्यावी, अशी लेखी मागणी केली होती. त्यासाठी उमरोली ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत देखील ठराव घेण्यात आल्यानंतर उमरोली ग्रामपंचायतीकडून डिकसळ गावातील शांतीनगर भागासाठी पाणी साठवण टाकी बांधण्याचे काम मंजूर केले.त्यासाठी ग्रामपंचायतने 15 वित्त आयोगातून दोन लाखाचा निधी मंजूर केला असून, त्या कामाचे कार्यादेश देण्यात आल्यानंतर शांतीनगर भागात बांधण्यात येणारी पाणी साठवण टाकीच्या कामाचे भूमिपूजन आज 11 डिसेंबर रोजी करण्यात आले.
या टाकीचे भूमिपूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख समीर साळोखे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. त्यावेळी ग्रामस्थ दिनेश भासे, पप्पू सावंत, राजेश जाधव,अनिल भासे,विनायक पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. डिकसळ गावात शांतीनगर भागात आता नवीन साठवण टाकी बांधली जाणार असून त्यानंतर सर्व ग्रामस्थांना नवीन नळ जोडण्या करण्यात येणार आहेत अशी माहिती किशोर गायकवाड यांनी दिली.