मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?

भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप

| नाशिक | प्रतिनिधी |

मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज झाले असून, त्यांनी आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. दरम्यान, भुजबळांच्या नाराजीबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, छगन भुजबळांना राज्यसभेवर जायचं होतं, आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. पटेलांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी मी राज्यसभेवर जायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तेव्हा मला नकार देण्यात आला आणि आता मी आमदार म्हणून निवडून आलो आहे तर आता मला राज्यसभेवर जायला सांगतायत. मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?

प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, नक्कीच मी सहा महिन्यांपूर्वी राज्यसभेवर जाण्याची इच्छा वरिष्ठांपुढे व्यक्त केली होती. परंतु, तेव्हा त्यांनी मला नकार दिला. ते मला म्हणाले, आता आपण सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार आहोत. माझी काही हरकत नव्हती. त्यानंतर त्यांनी मकरंद पाटील यांच्या भावाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हादेखील मी राज्यसभेचा विषय काढला होता. मात्र वरिष्ठांनी मला नकार दिला. तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघात विजय मिळणं कठीण आहे. तुम्ही निवडणूक लढत असाल तर आपले कार्यकर्ते जोमाने राज्यभर काम करतील. मी त्यावरही हरकत घेतली नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मी व माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आता मी विधानसभा निवडणुकीत जिंकलो आहे. आता ते लोक मला म्हणतात की, आपण मकरंद पाटील यांना मंत्री केलं आहे. आता त्यांच्या भावाला आपण राजीनामा द्यायला सांगू आणि तुम्हाला आपण राज्यसभेवर पाठवू. परंतु, त्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी असं केलं तर ही माझ्या मतदारसंघातील लोकांची प्रतारणा होणार नाही का? मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? असा संतापदेखील भुजबळांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता महायुतीत मंत्रिमंडळ विस्तारानंतर धुसफूस सुरू असून, घटक पक्ष राष्ट्रवादीतही नाराजीनाट्य समोर येत असल्याची चर्चा आहे.

Exit mobile version