कौशल्य विद्यापीठाच्या इमारतीचे उद्या भूमिपूजन

राज्यपाल रमेश बैस यांची प्रमुख उपस्थिती

| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरुपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालय इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम दि.27 मार्च रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे सकाळी 11 वा. महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे मुख्य वित्त व लेखा अधिकारी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ मुंबई वि.उ. यादव यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात, एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालय, मुंबई येथे सुरु करण्यात आले आहे. दरम्यान शासनाकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथील 10 एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयाकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांचे एकत्रित बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.

Exit mobile version