रोटरी क्लब ऑफ नवी मुंबईचा स्तुत्य उपक्रम
। नवी मुंबई । वार्ताहर ।
माडभुवन आदिवासी वाडी येथे दोन विकास कामांचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी येथील आदिवासी वाडी येथे शाळेच्या वर्ग खोली बांधकामाचे भूमीपूजन व बोअरवेल बसविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष महाजनी व त्यांच्या पत्नी वंदना महाजनी तसेच सामाजिक कार्यकर्ते दर्शन भोईर, रत्नाकर घरत, ग्राम पंचायत सदस्य दामा माडे, पांडुरंग लेंडे आणि मोठ्या संख्येने वाडीतील महिला, पुरुष उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामे या वाडीसाठी केल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि टँकरग्रस्त वाडीला रोटरीच्या माध्यमातून बोअरवेल आणि शाळेला वर्ग खोली बांधून देणार या आनंदाने ग्रामस्थांनी महाजनी आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा आदिवासी बांधवांकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त विकासकामे याच वाडीत केली. माडभुवन वाडीला बोअरवेलला भरपूर पाणी लागले आहे. परंतु हे पाणी वाडीपर्यंत आणण्यासाठी जो काही खर्च येईल तो खर्च रोटरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच महिला विकासासाठी स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण आणि सहकार्य करण्याचे संबोधित केले.