पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका हा नेहमीच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला असून, शेकापच्या वतीने पनवेल तालुक्यात नेहमीच विकासाची कामे करण्यात येतात, असे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील यांनी सांगितले. ते नितलस येथे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील नितलस ग्रामपंचायत हद्दीत विविध कामांचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच नारायण भोपी, सुनील काठे, दत्तात्रेय पाटील, राम दरे, तुलशिराम पाटील, आरविंद पाटील, भगवान चैाधरी, एकनाथ पाटील, पांडुरंग म्हात्रे, कैलास भोईर, हरि दरे, भीमराव दरे व पराग भोपी आदी मान्यवर उपस्थित होते. काशीनाथ पाटील यांच्या हस्ते नितलस येथे रस्ता काँक्रिटीकरण व पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन करण्यात आले. ही कामे 15व्या वित्त आयोगामार्फत करण्यात येणार आहेत. याप्रसंगी नितलस ग्रामपंचायतमधील अंगणवाडी दुरुस्तीचे भूमीपूजन करण्यात आले. हे काम पंचायत समिती निधीमधून करण्यात येणार आहे.
याच दिवशी सकाळी 11 वाजता पनवेल तालुक्यातील चिंधरण ग्रामपंचायत हद्दीत मोफत दंत चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.