| मुंबई | प्रतिनिधी |
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 41 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन किमती आजपासून (दि.1) एप्रिल लागू झाल्या आहेत.
ऑयल मार्केटिंग कंपन्यांच्या या दर कपातीच्या निर्णयामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून लागू झालेल्या या नवीन कपातीनंतर, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1714.50 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1755.50 रुपये होती. तर, कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1872 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1913 रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता 1924 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1965 रुपये होती. दरम्यान आता दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1762 रुपये झाली आहे. जी या कपातीपूर्वी 1803 रुपये होती.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर
दरम्यान घरगुती 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.






