। खारघर । प्रतिनिधी ।
पनवेल महापालिकेच्यावतीने नालेसफाई सुरु करण्यात आली. खारघर मधील काही ठिकाणी नालेसफाई सुरू केली मात्र नावापुरता पाहायला मिळाली. नगरसेविका लीना गरड ( प्रभाग क्रमांक 5 सेक्टर 12 ) समन्वयक मधु पाटील ( प्रभाग क्रमांक 4 सेक्टर 19 ), बालेश भोजने ( प्रभाग क्रमांक 6 सेक्टर 10 )यांनी नाल्यात उतरत व्हिडियो काढला . पण अजब गजब नालेसफाई समोर आली. नालेसफाई करताना फक्त मॅनहोल तसेच नाल्यावरील झाकण खालील सफाई केली आणि नाल्याच्या आजूबाजूला सफाई झालेली नाही. पहिला पाऊस येण्याआधी सर्व नाल्यातील गाळ आणि माती काढून पावसाच्या पाण्याला वाट करून द्यायला हवे होते मात्र दिखाव्यापुरता काम सुरू असल्याचे लीना गरड आणि त्यांच्या समन्वयकांनी व्हिडियो करत पोलखोल केली आहे.
स्वतः सभागृह नेते परेश ठाकूर यांनी खारघर नालेसफाईचा पाहणी दौरा केला होता. मात्र हा पाहणीदौरा होता की आणखी काय हा संशोधनाचा विषय आहे. दौरा करत त्यांनी काय सिद्ध केले. कारण होत असलेल्या नालेसफाई मध्ये नाल्याच्या आतमधील गाळ , माती तशीच आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याला अडथळा निर्माण होतो. आत मधून काढलेली माती तिथेच बाजूला टाकण्यात येते. आणि तीच माती पुन्हा नाल्यात जाते. नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदारी, कमिशन घेणारे संपन्न झाले आहेत.
नगरसेविका तसेच कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी पूर्ण नालेसफाई झाल्या शिवाय कंत्राटदाराला बिले देऊ नये अशी मागणी केली आहे. फक्त नावापुरता सुरू असलेल्या नालेसफाईचा काय फायदा ? मागील गोष्टींचा धडा घेऊन नालेसफाई केल्यानंतर त्वरित ही माती त्याचबरोबर कचरा उचलून टाकावा असंही त्या म्हणाल्या.