। तळा । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील तळा नगरपंचायतीत गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत शिवसेनेने केवळ विकासाच्या बाता मारल्या असून आतादेखील कोट्यावधी रुपयांच्या कामाच्या वल्गना केल्या जात आहेत.
केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपसरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ तळा शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी करून द्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडून द्या.”‘ असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी तळा बळीचा नाका येथे घेतलेल्या प्रचारसभेत केले. तळा नगरपंचायत हद्दीत नळपाणी योजना, घनकचरा नियोजन, नाना नानी पार्क, सुसज्ज वाचनालय, तरुणांना नोकरीची संधी, व्यापारासाठी विविध सुविधा असाच सर्वंकष विकासाचा आराखडा राबवण्यात येणार असल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना तळा शहरातील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून देण्याची गरज आहे, “‘ असे आवाहन आ.दरेकर यांनी उपस्थितांना केले.
तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या. नगरपंचायतीचा कारभार आ. प्रवीण दरेकर स्वतः लक्ष घालून चालवेल. एखादा कमी सदस्य निवडून आल्यास अन्य पक्षांच्या चांगल्या सक्षम नगरसेवकांसोबत सत्तास्थापन करु तसेच उर्वरित चार जागांसाठी निवडणूक लढवून यंदा भाजपची सत्ता आणू अशी ग्वाही देतानाच आ.दरेकर यांनी मतदारांनी त्यांचे भाजप उमेदवारांना दिलेले मत तुमच्या लाडक्या प्रवीण भाऊलाच देत असल्याची खात्री बाळगावी, “‘ असे भावनिक आवाहनही केले.
याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव रवि मुंढे,जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते,तळा तालुका अध्यक्ष ऍड निलेश रातवडकर, तसेच भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.