प्रसाद लाड यांच्याकडून चुकीचे विधान
| मुंबई | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करुन सर्वच राजकीय पक्षांच्या रोषाला भाजपला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आणखी एक वाचाळवीर आ.प्रसाद लाड यांनी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, त्यांनी किल्ले रायगडावर शपथ घेतली असे चुकीचे वक्तव्य केले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. यावरुन विरोधकांनी भाजपला आधी या वाचाळवीरांना खरा इतिहास शिकवा, असा उपरोधित सल्ला दिला.
कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली, असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांना लक्ष्य करत भाजपावर टीका केली. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसर्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही लाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लाड यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी शिवनेरीवर जन्म झाला, चूक सुधारत सांगितलं. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.
आ. प्रसाद लाड
शिवाजी महाराजांचे विचार घेऊ नका, फक्त वाद करा. महाराजांनी जे सांगितलं, घडवलं त्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या नाहीत. फक्त वाद करत बसायचे आहे, अपयश झाकण्यासाठी असे अनेक विषय काढले जातात. जेणेकरून इतर विषयांवरील लक्ष भरकटवण्यासाठी हे सर्व सुरू आहे.
राज ठाकरे
मनसे अध्यक्ष