जागावाटप फॉर्मुल्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांचे घुमजाव

| मुंबई | प्रतिनिधी |

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवणार आहे, असे विधान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. मात्र, आपल्याच विधानावर त्यांनी घुमजाव केले आहे. 288 जागा भाजप-शिवसेना युती लढेल आणि 200 जागा जिंकेल, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. त्याचवेळी आपण बोललो त्याचे अर्धेच दाखविण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी मीडियावर खापर फोडले आहे. बावनकुळेंच्या या विधानावरुन शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेना आणि भाजप 288 जागा युतीत लढणार आहे. आमचे एनडीए घटक पक्ष त्यातही असतील. राष्ट्रीय नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही 200 जागा जिंकणार आहोत. महाविजय 2024 असेल. पूर्वी युतीला मिळाल्या नाही तेवढा मोठ बहुमत आम्हाला मिळेल. त्याच्या तयारीची आमची बैठक होती. मात्र, काही विपर्यास करुन क्लिप दाखवण्यात आली आणि त्यातील अर्धा भागच होता. 288 जागा भाजपा-शिवसेना युती लढेल आणि 200 जागा जिंकेल, असे ते म्हणाले.

बावनकुळेंना अधिकार कुणी दिले
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्टेटमेंटमध्ये दम नाही. बावनकुळे यांना एवढे अधिकार कोणी दिले, हे माहिती नाही? अशा वक्तव्यामुळे युतीमध्ये बेबनाव निर्माण होतो, याची जाणीव बावनकुळे यांना असायला पाहिजे, अशी टीका शिंदे गटाचे आ.संजय शिरसाट यांनी केली. आम्ही काय मुर्ख आहोत का फक्त 48 जागा लढवायला? भाजप-शिवसेना जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो काही निर्णय घेतील त्यांना घेऊ दे. चंद्रशेखर बावनकुळे यांना हे अधिकार कोणी दिले? अशाने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढते, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

Exit mobile version