भाजपच्या प्रचाराची हौस; तळपत्या उन्हात नागरिकांचे हाल

| अलिबाग | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविजय 2024 हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या अलिबागमध्ये आयोजित केला. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते. भाजपच्या प्रचाराची हौस झाली. मात्र, भर दुपारच्यावेळी तळपत्या उन्हामुळे कार्यकर्त्यांचे प्रचंड हाल झाले. ढिसाळ नियोजनाचा फटका यावेळी कार्यकर्त्यांना बसला. दरम्यान, काल ठाण्यातदेखील या कार्यक्रमाचा बोजवारा उडाला अशी टीका झाली होती.

तालुक्यातील अनेक भागातून मोठ्या संख्येने आदिवासी समाज या कार्यक्रमात सहभागी झाला होता. बस, मिनीडोअर, दुचाकीवर बसून हजारो कार्यकर्ते अलिबागमध्ये दाखल झाले. दुपारी बारानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे अलिबाग शहरामध्ये आगमन झाले. अलिबाग शहरातील बालाजी नाका ते बाजारपेठ-छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या संवाद यात्रेच्या दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रॅलीचा फटका नवरात्रौत्सवात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसला. त्याचा परिणाम काही विक्रेत्यांनादेखील बसल्याची चर्चा आहे.

संवाद यात्रा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सभा घेण्यात आली. सभेसाठी व्यासपीठ उभारण्यात आले. मात्र कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली नाही. मंडप उभारले नसल्याने भर उन्हात उभे राहण्याची वेळ आली. भाजपच्या प्रचाराच्या हौसेचा फटका कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात बसला. तळपत्या उन्हामुळे अनेकांचे हाल झाले. त्यामुळे काहींनी बावनकुळे यांच्या भाषणाच्यावेळी काढता पाय घेतल्याचे चित्र दिसून आले.

कार्यक्रम उन्हात घ्यायला नको होता..
अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी संवाद साधण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यकर्ते या परिसरात जमले होते. दुपारी एकनंतर बावनकुळे सभेच्या ठिकाणी आले. एक ते दीड तास झालेल्या या कार्यक्रमाच्यावेळी ऑक्टोबर हीटचा फटका उपस्थितांना बसला. हजारो नागरिक भर उन्हात उभे होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. काहींनी उन्हापासून बचाव करीत सावलीसाठी बाजूला असलेल्या दुकानांचा अधार घेतला. हा कार्यक्रम आता उन्हात घ्यायला नको होता अशा प्रकारची चर्चाही कार्यकर्त्यांमध्येच सुरु होती.
Exit mobile version