। तळा । वार्ताहर ।
तळा बाजारपेठेत सध्या काळ्या चिंबोर्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. वर्षातून फक्त तीन महिने या चिंबोर्या मिळत असल्याने बाजारपेठेत त्यांना मागणी वाढली आहे. यामुळे या काळ्या चिंबोर्या विकुन आदिवासी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.पावसाळ्यानंतर नदीचे पाणी ओसरू लागल्यावर पुन्हा मासेमारीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते. पावसाळ्यानंतर नदीचे पाणी शुद्ध झाल्यावर आदिवासी बांधव रात्रीच्यावेळी नदीच्या किनारी गॅसबत्तीच्या साहाय्याने दगड-गोटात काळ्या चिंबोर्या पकडायला जातात. या चिंबोर्या काळ्याभोर असल्यामुळे रात्रीच्या अंधारात मोठ्या चतुराईने तिला पकडावे लागते. पावसानंतर वर्षभरात दोन ते तीन महिनेच नदीला चिंबोर्या मिळतात. यामुळे या चिंबोर्यांना चांगला भाव मिळतो. सध्या तळा बाजारपेठेत तीनशे रुपयांना सहा चिंबोर्या या प्रमाणे विक्री केली जात आहे. चिंबोरीचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने शहरातील नागरिक स्वतःसह शहरात असलेल्या आपल्या नातेवाईकांना पाठविण्यासाठी त्या खरेदी करतात. यामुळे आदिवासिंना रोजगार उपलब्ध होतो.