| सातारा | वार्ताहर |
सातारा शहरात गुरुवार पेठेत काळा दगड येथे एका ‘सर्व्हिसिंग सेंटर’मधील कॉम्प्रेसर फुटून झालेल्या भीषण स्फोटात एक जण जळून जागीच ठार तर दोन जण भाजल्याने गंभीर जखमी झाले. मुजमील हमीद पालकर असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. हरून बागवान व उमर बागवान हे दोघे या स्फोटामध्ये जखमी झाले असून त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्याच्या नियोजनात दुपारी सर्व यंत्रणा असताना गुरुवार (माची) पेठेत काळा दगड येथे एका छोट्या दुकानात अचानक झालेल्या स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला. आजूबाजूच्या घरांना तडे गेले. घरांच्या काचा फुटल्या. परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. काय झाले हे कोणालाही कळत नव्हते. स्फोट झालेल्या परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली. शाहूपुरी व सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. अधिक चौकशी करता दुकानातील कॉम्प्रेसरचे शॉर्ट सर्किट झाल्याने स्फोट झाल्याचे उघड झाले.