। सातारा । प्रतिनिधी ।
31 मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून 3269.06 मेगावॅट अवर्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती झाली आहे. ही वीजनिर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील 67.50 टीएमसी साठ्याच्या वापरातून झाली आहे. त्यामुळे शासनाला सुमारे 144 कोटी रुपयांचा आर्थिक लाभ झाला आहे. 105 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निर्णयानुसार होते. यामध्ये 67.50 टीएमसी पाणी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी, तर 40 टीएमसी पाणी पूर्वेकडील सिंचन आणि बिगरसिंचन प्रकल्पांसाठी वापरण्यात येते. वर्षभरात पश्चिमेकडील जलविद्युत केंद्रांमधून जेवढी वीजनिर्मिती झाली, ती कोळशावर आधारित प्रकल्पांमधून केली गेली असती, तर प्रतियुनिट सरासरी 4.40 रुपये दराने 144 कोटी रुपयांहून अधिक खर्च शासनाला करावा लागला असता.