। अलिबाग । प्रतिनिधी ।
काही दिवसांपूर्वी महाड येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांच्याकडून भरत गोगावले यांची नॅपकीन वापरण्याबाबत नक्कल करत खिल्ली उडवण्यात आली होती. त्याच मैदानावर गोगावले यांच्याकडून हजारो कार्यकर्त्यांना नॅपकीन वाटप करून, हवेत उडवून तटकरेंच्या नॅपकीन खिल्लीला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये रायगडमध्ये रंगलेल्या नॅपकीन वॉरची जोरदार चर्चा सुरू आहे. यातून महायुतीत असणारी खदखद जनतेसमोर आली आहे.
पालकमंत्रीपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून शिंदे गटाचे नेते राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये असलेले अंतर्गत वाद लपून राहिलेले नाहीत. पालकमंत्रीपद मलाच मिळणार या आशेवर गोगावले आहेत. मात्र, त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा अद्याप सरकारने दिली नाही. मागील विधानसभा निवडणुकीत तटकरेंनी मदत केली नाही, असा आरोप गोगावलेंनी वेगवेगळ्या कार्यक्रमातून केला आहे. तटकरेंना निवडून देण्यासाठी आम्ही मदत केली, असे ते जाहीरपणे सांगत आहेत. मात्र, त्यांच्या टोल्याला प्रत्युत्तर देणे तटकरेंनी टाळले होते. परंतु, मागील काही दिवसांपूर्वी महाडच्या चांदे येथील मैदानात राष्ट्रवादीचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या दरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणातून गोगावलेंच्या मतांचा हिशोब घेतला. त्यानंतर भाषणाची सांगता करताना त्यांनी गोगावलेंच्या स्टाईलने नॅपकीन खांद्यावर घेत खिल्ली उडवली. तटकरे यांनी गोगावलेंची खिल्ली उडविल्याने महायुतीमधील नॅपकीन वाद चव्हाट्यावर आले.
नुकताच गोगावले यांचा महाड येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. चांदे येथील मैदानातच त्यांचा वाढदिवस सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात नॅपकीन वाटप करून सुनील तटकरे यांना गोगावले यांनी डिवचले आहे. आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना नॅपकीन वाटप केले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी नॅपकीन हवेत उडवून तटकरेंच्या नॅपकीन खिल्लीला प्रत्युत्तर देण्याचे काम केले. त्यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये रायगडमध्ये नॅपकीन वॉर सुरु झाले आहे.
तटकरे आणि गोगावले यांचे नॅपकीन वॉर आता अधिकच पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खासदार सुनील तटकरे यांची कार्यक्रमात थट्टा उडविल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाले आहे.
आ. दळवींचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
भरत गोगावले हे रायगडचे नाही, तर महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री यांच्यापेक्षा गर्दी असते,असे बोलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात होणार्या गर्दीला आव्हान केल्याची चर्चा सध्या राजकारणात सुरु आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा महाड येथे चांदे मैदानात वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
महायुतीत राष्ट्रवादी नाहीच
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये संबंध राहणार नाही. येणार्या निवडणुका भाजप-शिवसेना सोबत लढणार आहेत. रायगडच्या राजकारणातून त्यांना हद्दपार करण्याचे काम करायचे आहे. ज्यांना मालकत्व झाले नाही, त्यांनी पालकत्व स्वीकारू नये, असा टोला आदिती तटकरे यांना लगावत चिटर फॅमिलीने तीन वेळा फसविले आहे. ते रायगडचा कलंक आहेत, असे वक्तव्य आ. दळवींनी केले.