चोहीकडे पर्यटकच पर्यटक
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड सज्ज झाला आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी सहकुटुंब, सहपरिवारासह दाखल झालेले आहे. या पर्यटकांच्या स्वागतासाठी सर्व हॉटेल्स, मॉल्स, फार्महाऊसेस, रिसॉर्टवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने अवघा रायगडात झगमगाट झाल्याचे दिसत आहे.
किनार्यांवर तोबा गर्दी
अलिबागसह रायगडातील सर्वच किनार्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने वातावरण उत्साही बनले आहे.या काळात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह नगरपालिका यंत्रणाही सतर्क झाली आहे.पोलिसांच्यावतीने महामार्गावर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तरीही उत्साही पर्यटकांच्या बेशिस्तपणाने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
माथेरानमध्ये तोबा गर्दी
माथेरान मधील रस्ते आणि झाडांवर रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.त्यामुळे माथेरान हे दिव्यांनी उजळून गेले आहे,जागोजागी पर्यटक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आलेले पर्यटक हे जागोजागी सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे सर्व माथेरानला थर्टी फस्ट चे फिव्हर चढल्याचे दिसून येत आहे.
माथेरान मधील लॉजिंग व्यवस्था पाहणारे लॉजिंग असोसिएशनने पर्यटकांना कोणत्याही प्रकारचे दरवाढ न करता नेहमीच्या दरात पर्यटकांना रूम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली आहे. पर्यटकांच्या सेवेसाठी माथेरान मधील अनेक मोठ्या हॉटेल्स मध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. बहुतेक हॉटेलस मध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रा तसेच सेलिब्रेशन आयोजित केली आहेत.त्यासाठी काही हॉटेल्स मध्ये बाहेरून विशेष गायक कलाकार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर रात्री साडे अकरापर्यंत डीजेचा धुमाकूळ देखील माथेरानच्या जंगलात ऐकायला मिळणार आहे.हॉटेल प्रीती,कुमार प्लाझा,रंगोली सारख्या हॉटेल्स मध्ये पर्यटकांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.