| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील उसर येथे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गेल कंपनीकडून हायड्रोजन पॉलीप्रोपलींग प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम जोमाने सुरू असून, सुमारे 8 हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात करण्यात येत आहे. हा प्रकल्प 2025 मध्ये कार्यान्वित होणार असल्याची माहिती, कंपनीचे चिफ जनरल मॅनेजर अनुप गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली.
अलिबाग तालुक्यातील उसर येथे गेल कंपनीचा एलपीजी प्रकल्प कार्यान्वयीत होता. मात्र, गॅस पुरवठा होत नसल्याने 2015 मध्ये हा प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. आता या बंद पडलेल्या प्रकल्पाच्या जागेवर पॉलिमर निर्मितीचा महाकाय प्रकल्प येणार असून, आठ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत आहे. हायड्रोजन पॉलीप्रोपलींग युनीटची या ठिाकाणी उभारणी करण्यात येत आहे. यातून दरवर्षी जवळपास 1 हजार टन पॉलिमर निर्मिती केली जाणार आहे.
हा प्रकल्प 2025मध्ये कार्यान्वित होणार असून, या प्रकल्पातून सुमारे 1 हजार 700 रोजगार निर्मिती तसेच अप्रत्यक्षपणे आणखी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. कंपनीच्या 21 कोटी रुपयांच्या विकानिधिमधून परिसरातील गावांमध्ये कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यांसह इतर क्षेत्रात कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती अनुप गुप्ता यांनी दिली यावेळी यावेळी महाप्रबंधक जितीन सक्सेना यांच्यासह प्रोजेक्ट जनरल मॅनेजर वीरेंद्र कुमार, प्रवीण लोखंडे उपस्थित होते.