पर्यटकांना सावधानतेचा इशारा
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड जंजिरा समुद्रकिनारी ‘ब्लू बटन जेलीफिश’ या निळसर रंगाच्या आकर्षक, संवेदनशील समुद्री जीवामुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पर्यटकांनी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना सावधगिरी आणि जागरूकता बाळगणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुडमधील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. जावेद खान, प्रा. अल्ताफ फकीर व प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी केले आहे.
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राणीशास्त्र विभागामार्फत या ‘ब्लू बटन जेलीफिश’विषयी जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती देताना प्राध्यापकांनी ब्लू बटन जेलीफिशविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणालेकी, ब्लू बटन जेलीफिशचे वैज्ञानिक नाव पोरपीटा पोरपीटा असे असून, हा खरा जेलीफिश नसून, हायड्रॉझोअन पॉलिप्सच्या वसाहतींचा समूह आहे. तो साधारण 23 सें.मी. व्यासाचा, निळसर रंगाचा, पारदर्शक पिशवीसारखा दिसतो. उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय समुद्रातील पृष्ठभागावर तरंगताना तो दिसतो. तो दिसायला आकर्षक असतो. त्यामुळे त्याला स्पर्श करण्याचा मोह आवरता येत नाही. परंतु, त्याला स्पर्श झाल्यास त्वचेवर खाज, सूज, जळजळ आणि चट्टे निर्माण होतात. त्यामुळे पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजचे आहे.
तरी, किनार्यावर फेरफटका मारताना अशा जेलीफिशपासून सुरक्षित अंतर ठेवा. चुकून संपर्क झाल्यास, प्रभावित भाग समुद्राच्या पाण्याने ताबडतोब धुवावा. बर्फाचा शेक द्या आणि लक्षणे तीव्र असतील तर तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या. मुले आणि पर्यटकांनी विशेषतः खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.