तक्रारदाराकडे केली तीन हजार रुपयांची मागणी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे खरेदी केलेल्या जागेच्या सातबारा उताऱ्यावरील नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणारा मंडळ अधिकारी जगन्नाथ हिरू ठाकूर (वय 55 वर्ष, मंडळ अधिकारी, चरी-तालुका अलिबाग जिल्हा रायगड, राहणार चेंढरे, अलिबाग,रायगड) याच्यासहित सुनील गजानन मोकल ( वय 50 वर्ष, खाजगी मदतनिस इसम ) तलाठी सजा शहापूर ता.अलिबाग, (रा.मोठे शहापूर, ता.अलिबाग) याना अलिबाग लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
याबाबतची हकीकत अशी की, फिर्यादी यांनी पोयनाड तलाठी सजा यांच्या हद्दीत जागा खरेदी केली होती. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे सातबारा उताऱ्यावरील तलाठी सजा पोयनाड यांनी केलेली नोंद मंजूर करण्याकरिता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून समक्ष खाजगी इसम आरोपी क्र. 2 च्यामार्फत पोयनाड बाजारपेठ येथे स्वीकारत असताना पोलिस उपअधीक्षक सुष्मा सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग लाच लूचपत विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
रायगड लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार, अरुण करकरे, विनोद् जाधव, महेश पाटील, सचिन आटपटकर, पोलीस नाईक शरद नाईक चालक सहायक फौजदार अरुण घरत यांनी कारवाई केली आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा असे आव्हान पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांनी केले आहे.