शवविच्छेदनानंतर चारही मृतदेह नातेवाईकांकडे
। अलिबाग । भारत रांजणकर ।
अलिबागमध्ये मंगळवारी घडलेले हत्याकांड हे अनैतिक संबंधातूनच घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, चारही मृतदेहांचे शवविच्छेदन अलिबाग जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पोलीस अधिकार्यांकडून सांगण्यात आले. मृत महिलेच्या पतीने 2 मे रोजी आपली पत्नी प्रियांका तर प्रियकर कुणाल याच्या कुटूंबियांनीही तो हरवल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे या घटनेला वेगळेच वळण आले आहे. महिला आपल्या दोन लहान मुला-मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती 11 मे रोजी आपल्या प्रियकरासोबत अलिबाग येथे आली. सहा दिवस अलिबाग परिसरात पर्यटनाचा आनंद या चौघांनीही लुटला.
मात्र 16 मे रोजी रात्रीचे जेवण करून त्यांनी रूम आतून लावून घेतली. त्यानंतर दुसर्या दिवशी दुपारपर्यंत रूममध्ये शांतता होती. कोणतीही हालचाल दिसत नसल्याने कॉटेज मालकाने मंगळवारी (दि. 17) दुपारी तीन वाजता दुसर्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी रुममध्ये चारही जण मृतावस्थेत आढळून आले. प्रियांका व कुणाल यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. दोन्ही मुलांचे मृतदेह बेडवर होते. कॉटेज मालकाने त्वरित अलिबाग पोलिसांना कळवले. घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मृतांच्या कुटूंबियांना याबाबत कळविण्यात आले. या चौघांचे बुधवार सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.या चौघांचा व्हिसेरा अधिक तपासासाठी मुंबईला पाठविण्यात आला आहे.
मुलांचे शव पाहताच अपंग बापाने हंबरडा फोडला
मयत प्रियांका संदीप इंगळे आणि या महिलेचा तीन वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाच्या मुलाची शव घेण्यासाठी या मुलांचा अपंग बाप संदीप इंगळे आपल्या नातेवाईकांसह जातेगाव, ता. शिरुर, जिल्हा पुणे येथून आला होता. महावितरण कंपनीत शिक्रापुर विभागात वायरमन म्हणून काम करणार्या या बापाला मुलांचे शव पाहुन रडू आवरले नाही. तब्बल पंधरा दिवसापूर्वी त्यांने मुलांना पाहिले होते. त्यानंतर या मुलांना पाहताना तो गर्भगळीत झाला. संदीप इंगळे यांच्याबरोबर त्याच्या पत्नीच्या माहेरचे चव्हाण कुटुंबिय देखील रात्री 11 वाजता अलिबागमध्ये आले होते. संदीप इंगळे कामावर असतानाच दुपारी त्याच्या मुलांच्या हत्येची बातमी समजली, तो महावितरणच्या गणवेशावरच आला होता. रात्रीपासून हे सर्व नातेवाईक अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारतच होते.
डॉक्टरही गहिवरले
या चौघांवर शवविच्छेदन करणारे डॉ. काशिनाथ स्वामी यांनाही लहान मुलांचे मृतदेह पाहिल्यावर दुःख अनावर झाले. त्यांनी सकाळी 9.30 वाजता प्रथम दोन लहान मुलांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर कुणाल आणि प्रियांका यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. स्वामी यांच्या म्हणण्यानुसार मुलांची हत्या विषारी द्रव्य पाजून झाली असावी, असा अंदाज आहे; तर पुरुष आणि महिलेच्या गळ्यावर फास घेतल्याच्या खुणा होत्या. या चौघांचा व्हिसेरा घेण्यात आला असून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूची वेळ आणि कोणते विषारी द्रव्य वापरले होते ते वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच समजेल, असे डॉ. स्वामी यांनी सांगितले.
शिक्रापूर पोलीस अलिबागमध्ये दाखल
याबाबतची माहिती रायगड पोलिसांनी कळविल्यानंतर शिक्रापूर पोलीस अलिबागमध्ये दाखल झाले होते. प्रेमीयुगुलांनी अखेरच्या घटका मोजत असताना एकमेकांसमवेत प्रेमाचे क्षण घालवत आत्महत्या केली. तसेच त्याचा व्हिडिओ केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी रुममधून मोबाईल ताब्यात घेतला असून तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच फोन लॉक असल्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माहिती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार संदीप आणि कुणाल हे मित्र होते.त्या मैत्रीतूनच त्यांचे घरी येणे जाणे सुरु होते.त्यातून कुणालचे आणि प्रियंका यांचे प्रेमसंबंध जुळले होते.त्यातूनच हे प्रकरण घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही घटना रात्री जेवण झाल्यानंतर झाली असावी, असा अंदाज कॅटेजचे संचालक समीर पल्लवकर यांचा आहे. त्यांच्याच ब्लोसम कॅटेजमध्ये ही घटना घडली होती. मंगळवारी दुपारी 3 वाजता ही घटना उघड होण्यापूर्वी साधारण 18 तास त्यांच्या मृत्यूस होऊन गेले होते. रुममध्ये एसी सुरू असल्याने चौघांचेही मृतदेह पूर्णपणे ताठरले नव्हते. अलिबाग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या करणार्या दोघांविरोधात पुणे ग्रामीणमधील शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.