मुरूड येथील मच्छीमार हैराण; समुद्रात पुन्हा वादळी वारे
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
सतत बदलणारे हवामान, जेलिफिशचे वाढते आक्रमण, अवकाळी वादळ, पाऊस, समुद्रात होणारे प्रदूषण, बेकायदेशीर स्पीड मासेमारी यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाऊनही मासळी मिळेनाशी झाली असून अगोदरच मेटाकुटीला आलेला मच्छीमार यावर्षी अधिक भरडला असून पावसाळ्यात काय आणि कसे जगायचे याचीच मोठी चिंता चेहर्यावर दिसून येत आहे. जेलिफिशचे प्रमाण दुपटीने वाढले असून ही जेलिफिश नामक दाहक मासळी डोलीची जाळी ठिकठिकाणी फाडत असल्याची माहिती एकदरा महादेव कोळी समाज अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी दिली. त्यामुळे दोन्ही बाजूने नुकसान होताना दिसून येते.
समुद्रात मासा त्याचा काय भरोसा, असे पूर्वी गमतीने म्हटले जायचे. परंतु आज समुद्रात मासळी मिळत नसल्याने मासेमारी बेभरवशाच्या गमतीवर हेलकावे खाताना दिसून येत असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे यात शंकाच नाही. आज खरी गरज आहे ती हे सर्व अडथळे दूर करून मासळी उत्पादन वाढण्यासाठी नव्याने संशोधन होणे गरजेचे आहे.प्रसंगी कडक नियमांची अमंलबजावणी देखील महत्त्वाची आहे. मुरूड आणि एकदरा समुदात छोट्या मोठ्या मिळून 150 ते160 मासेमारी नौका मासेमारी करीत असून ऐन मासेमारी सिझन मध्ये जेलिफिशचे प्रमाण दुप्पट झाल्याने मासळीपेक्षा जेलिफिश आधिक मिळत असून ही मासळी नाईलाजाने पुन्हा समुद्रात टाकून द्यावी लागत आहे. ही मासळी कोणीही खात नाही. मासळीच्या स्पर्शाने अंगाला खाज सुटते.हाजारो लाखो रुपये खर्चून मच्चीमार समुद्रात जात असतात. परंतु मासळी मिळत नसल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे अखेर 1 जून पूर्वीच नौका लॉकडाऊन मार्गावर दिसून येत आहेत.सुमारे 70 टक्के नौका किनार्यावर ओढण्यात आल्या आहेत.
बुधवारी रात्री एकदरा येथील काही नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. मासेमारीस जाळी टाकली असताना गुरुवारी पहाटेच्या वेळी अचानक समुद्रात उपरती वादळी वारे वाहायला सुरुवात झाल्याने घबराट उडून मच्छीमारांनी मासेमारी सोडून तातडीने किनार्यावर धाव घेतली.
रोहन निशाणदार, मच्छीमार, एकदरा