बोटी निघाल्या दर्यात

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरुडमधील एकदरा बंदरातील कोळी बांधव होळी उत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या घरी आले होते. आता उत्सव आटोपून पुन्हा आपल्या उदर निर्वाहासाठी खोल समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाले असून, त्यांची लगबग दिसुन येत आहे.

मुरूडमधील कोळी बांधव खोल समुद्रात निघण्यापूर्वी आपल्या बोटींची डागडुजीची कामे पुर्ण करुन रंगपंचमीच्या मृहर्तावर खोल समुद्रात जाण्यासाठीची तय्यारी करित आहेत. खोल समुद्रात मासेमारी करित असताना मोठ्या बोटींवर भरपूर दिवस राहावे लागते. मिळालेली मासळी ताजी राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ भरण्यात येत आहे. त्याचबरोबर रॉकेल, डिझेल, महिनाभर पुरेल एवढे धान्य, खाद्यपदार्थ व विविध वस्तू बोटीवर भरण्यास सुरुवात झाली आहे. विविध संकटाना सामोरे जाणारे मच्छीमार पुन्हा नव्या उमेदीने मासेमारी करण्यासाठी खोल दर्यात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘संकटाचा काळ संपुन मासेमारी मोठ्या प्रमाणात होऊन झालेला कर्ज फिटो, धंद्यात चांगला फायदा मिळो’, हीच प्रार्थना समस्त कोळी समाज करित आहे.

Exit mobile version